Saturday, April 25, 2020



अजीम नवाज राही आणि कल्पना दुधाळ यांची कविता

--------------------------------------------------------------------------
डॉ. देवानंद सोनटक्के
सहाय्यक प्राध्यापक
पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग
 डी. पी. भोसले महाविद्यालय, कोरेगाव, जि. सातारा
                                       -------------------------------------------------------------------------------------

विद्यार्थी मित्रांनो !
 अजीम नवाज राही आणि कल्पना दुधाळ या नव्वदोत्तरी कवींच्या कवितांचा अभ्यास करताना आपण खालील उद्दिष्ट्ये ठरवली आहेत.
१.    कवी अजीम नवाज राही यांच्या कवी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे.
२.    कवी अजीम नवाज राही यांच्या कवितांची आशयसूत्रे शोधणे.
३.    कवी अजीम नवाज राही यांच्या कवितेतून प्रकटणाऱ्या मुस्लीम समाज-संस्कृतीचा शोध घेणे.
४.    कवी अजीम नवाज राही यांच्या कवितेशी शैली आणि प्रतिमासृष्टी यांचा शोध घेणे.
५.    कवयित्री कल्पना दुधाळ व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणे.
६.    कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितांची आशयसूत्रे शोधणे.
७.    कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेतून प्रकटणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचा शोध घेणे.
८.    कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितेशी शैली आणि प्रतिमासृष्टी यांचा शोध घेणे.
  प्रास्ताविक
विद्यार्थी मित्रांनो !
मराठी कवितेत १९९० हे वर्ष आणि त्यानंतर आलेली कविता खूप महत्त्वाची आहे. या वर्षापासून  भारतात जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. आपल्या भारताची व्यापारपेठ जगासाठी खुली झाल्याने एकूणच भारताचे अर्थकारण बदलून गेले. वस्तुविक्री व खरेदीसाठी जग हेच मोठे खेडे झाले. थेट संपर्क, इंटरनेट, आयात-निर्त्यातीची सैल झालेली बंधने यांमुळे जगाच्या कानाकोपऱ्यातली वस्तू सहज आपल्या दारात उपलब्ध झाली. त्याचे सांस्कृतिक-सामाजिक परिणामही घडून आले. माणसाचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निव्वळ ‘उपभोगवादी’, ‘वस्तुवादी’ झाला. समाजात चंगळवाद फोफावला. ‘वापरा आणि फेका’ हे तत्त्व रूजू लागले. आधी आपण बाजारात गरजेच्या वस्तू घेण्यासाठी जात होतो, आता बाजारात वस्तू आधी आल्या आणि त्यांच्या गरजा निर्माण केल्या गेल्या. यासाठी टीव्ही- इंटरनेट सारखी प्रभावी माध्यमे वापरून जाहिरातींचा मारा करण्यात आला. सेल आणि महोत्सवाचे पेव फुटले.
या साऱ्यांचा परिणाम आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जीवनावर झाला. आपली जीवनशैली बदलली. खाद्य संस्कृती, पेहराव, प्रवास, सण-समारंभ, बचत, खर्च, भेटवस्तू देणे-घेणे या बाबतचा आपला मूल्यविषयक दृष्टिकोन बदलून गेला. आर्थिक व्यवस्था बदलल्याने सामाजिक संबंध यांतही प्रचंड उलथापालथ झाली. कुटुंबे विभक्त होऊ लागली. रोजगारासाठी खेड्यातून शहरांकडे स्थलांतर होऊ लागले. त्यातून असुरक्षितता वाढली व  प्रांतवाद, जातीयवाद, धर्मांधता बोकाळली.
तात्पर्य अशा सांस्कृतिक बदलांमुळे; कवीच्या संवेदनशील मनाला हादरे बसत गेले. त्यातून त्यांची प्रतिक्रिया व त्यांचे भाष्य या अगोदरच्या मराठी कवितेपेक्षा वेगळे ठरले.
अशा नव्वदोत्तर कवितेत अजीम नवाझ राही आणि कल्पना दुधाळ हे दोन कवी महत्त्वाचे आहेत. विशेष म्हणजे हे कवी दोन वेगळ्या साहित्य प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारे कवी आहेत. राही मुस्लीम तर दुधाळ ग्रामीण समुदायाची जाणीव साकारात आहेत. जागतिकीकरणाच्या कोलाहलातील मुस्लीम आणि ग्रामीण समुदायाचे हे अस्वस्थ वर्तमान प्रकटत असल्यामुळे या कवितांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.   
 विवेचन
विद्यार्थी मित्रांनो ! सुरुवातीला आपण अजीम नवाज राही यांचा परिचय, त्यांच्या कवितेचे स्वरूप आणि त्यांची भाषाशैली यांचा अभ्यास करूया.  
§  कवी परिचय
अजीम नवाज राही (इ.स. १९६५) यांचा जन्म साखरखेर्डा, तालुका सिंदखेडराजा, जिल्हा बुलढाणा येथे झाला असून त्यांचे इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण साखरखेर्डा (जि. बुलडाणा) या गावी उर्दू माध्यमातून झाले. त्या गावात पुढील शिक्षणासाठी उर्दू माध्यम उपलब्ध नसल्याने राही यांना इयत्ता आठवीमध्ये मराठी माध्यमात प्रवेश घ्यावा लागला. इयत्ता दहावीत मराठीत नापास झाल्यामुळे पुढे त्यांनी शिक्षण सोडले. (आश्चर्य म्हणजे पुढे दहावीच्या मराठीच्या पुस्तकात राही यांच्या कवितेचा समावेश झाला.) सध्या ते पैनगंगा सहकारी सूत गिरणी येथे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 
राही यांचे ‘व्यवहारांचा काळा घोडा’(२००४), ‘कल्लोळातला एकांत’ (२०१२) आणि ‘वर्तमानाचा वतदार’ (२०१७) हे तीन कवितासंग्रह प्रसिद्ध असून त्यांच्या कवितांचे इंग्रजी तसेच हिंदी भाषेतही अनुवाद झाले आहेत. महाराष्‍ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या मराठी पुस्तकात त्यांच्या ‘दुष्काळ’ नंतर ‘पडझड’ या दोन कवितांचा समावेश केला आहे. शिवाय गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती यांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश केलेला आहे.
राही यांना आजवर महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, शरदचंद्र मुक्तिबोध काव्यपुरस्कार, महाराष्‍ट्र शासनाचा कवी केशवसुत पुरस्कार इत्यादी मानाचे पुरस्कारही लाभले आहेत.
§  अजीम नवाज राही : वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व आणि कवितेतील आशयविश्व
मित्रांनो, अजीम नवाज राही यांचा परिचय आणि त्यांच्या कवितेच्या अभ्यासाची उद्दिष्ट्ये पाहिल्यानंतर आता आपणाला त्यांचे कवी म्हणून असलेले व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या समग्र काव्यातील आशयविश्व पाहूया.  
  समाजातल्या आजवर अलक्षित राहिलेल्या ‘मुस्लीम जग’, ‘मुस्लीम मोहल्ला’, ‘मुस्लीम समाजमन’ अशा दुर्लक्षित अभिव्यक्तींला नव्वदोत्तरी मराठी कवितेत आणण्याचे मोठे काम राही यांच्या कवितेने केले आहे. एक सामाजिक शोध त्यांच्या कवितेत आहे. शिवाय अंजली कुलकर्णी म्हणतात त्याप्रमाणे, त्यांच्यात ‘कविता आणि मी’ असा शोधही आहे. कवितेनं आयुष्याला आकार नि अर्थ दिल्याचा कृतज्ञ भाव तर त्यात आहेच; शिवाय कवितेसोबतच्या आयुष्याचं उत्खननही त्यात दिसून येतं. (अंजली कुलकर्णी : लोकसत्ता, १५ एप्रिल, २०१८) म्हणजे भोवतालचा समाज आणि आपल्या कवी व्यक्तिमत्त्वाचा शोध हे त्यांचे कवी म्हणून वैशिष्ट्य आहे.
अजीम नवाज यांच्या कवितेतलं विश्व हे कष्टकरी समूहाचं आहे. त्यांची कविता बाहेरचं रमवणारं जग आणि मोहोल्ल्यातलं भेसूर वास्तव जग यातलं विदारक अंतर दर्शवते. त्यांच्या मोहोल्ल्याची दुनिया वेगळी असून त्याला कवितेबिवितेशी काही देणंघेणं, सोयरसुतक नाही; तर तिथे केवळ जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष आहे. या मोहल्ल्यातील लोकांना नेत्यांचा, पुढाऱ्यांचा, कवितेच्या क्षेत्रात समारंभ आयोजित करणाऱ्यांचा, समारंभाच्या पाहुण्यांचा, गर्दीचा, श्रोत्यांचा.. सर्वाचा अनुनय करता करता हाती शून्य आल्याची, एकाकीपणाची भावना अजीम नवाज यांच्या कवितेत व्यक्त होत जाते. अल्पसंख्यांक असल्यामुळे बहुसंख्यांकांच्या समूहात जगताना येणारी असुरक्षितता व दहशत हाही राही यांच्या कवितेत येत राहते.
§  अजीम नवाज राही यांच्या कवितेची आशयसूत्रे
मित्रांनो, आशयसूत्रे म्हणजे कवीच्या कवितेतून आशयात कोणकोणते विषय आलेले आहेत, त्याची सूत्रबद्ध केलेली मांडणी होय. आता अजीम नवाज राही यांच्या अभ्यासक्रमातील कवितांतील आशयसूत्रे पाहणे आता गरजेचे आहे.
आपल्या अभ्यासक्रमात राही यांच्या तिन्ही कवितासंग्रहातील ‘दुष्काळ: काही दाहक संदर्भ’, ‘जातीय दंगल: १२ भानगडींची १३ वळणे, ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद, ‘मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना’; ‘मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ या पाच कविता नेमलेल्या आहेत. या कवितांमधून दुष्काळग्रस्तांचे दु:ख; जातीय दंगलीची झळ पोचलेल्या प्रचंड दडपणाखाली जगणाऱ्या समाजाची वेदना, जातिधर्माच्या नावाखाली दुर्बलांवर दहशत गाजवणारे समूह, सामाजिक व भाषिक मोडतोडीतूनही कवितेचा होणारा जन्म, दंगलीमुळे निर्वासित झालेली वस्ती व तिच्यातील नष्ट झालेली भूतदया – ही आशयसूत्रे राही यांच्या कवितेत दिसतात.
डॉ. एकनाथ पाटील यांच्या मते, ‘धर्मांध आणि जातीय विद्वेषाच्या वातावरणात जाणीवपूर्वक धूसर बनवली जात असलेली ‘भारतीय ही ओळख अजीम यांची कविता प्राणापणाने जपू पहाते. या कवितेची मुळं अस्सल देशी आहेत. हिंदू-मुस्लीम संस्कृतीच्या समन्वयाची परंपरा ही कविता अभिमानाने मिरवते.’ (एकनाथ पाटील, प्रस्तावना, काव्यगंध,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पृ.२८)
‘दुष्काळ: काही दाहक संदर्भ’ या कवितेत सुक्या दुष्काळामुळे झालेली गावाची दुरावस्था चित्रित केली आहे. करपलेले गवत, आटलेल्या विहिरी, रानातून आलेल्या उपाशी गायी, त्यामुळे वासरांचे रात्रभर हंबरणे अशी गावाची अवस्था होते. घरे उदासवाणी आणि वस्त्या प्रश्नांकित होत जातात. मंदिरातील प्रार्थनेच्या पार्श्वभूमीवर म्हाताऱ्याकोताऱ्यांच्या गप्पांत भाकरीचाच विषय येत राहतो. उपाशी उंदरांचा धान्याच्या पेवात धुडगूस सुरू होतो आणि लहान मुलांचा ‘येरे येरे पावसा म्हणतानाचा उत्साह’ कुठल्या कुठे दूर पळून जातो. हडकुळा शेतकरी शेताच्या बांधावर नुसता  बसून राहतो, रानातून पाखरे पसार होतात;  रात्री वटवाघुळांची गर्दी वाढत जाते. सुख समृद्धीचे भविष्य सांगू पाहणाऱ्या ज्योतीषाचाही आवाज खोल जातो. असे दुष्काळाचे दारुण चित्र कवितेत रेखाटले आहे.
‘जातीय दंगल: १२ भानगडींची १३ वळणे या कवितेत जातीय दंगलीच्या आधीचे व दंगलीनंतरचे वातावरण टिपलेले आहे. दंगलीच्या आधी बहरलेल्या समाजाच्या झाडांचा मोहोर झडू लागतो. समाजात पूजनीय असलेल्या प्रतीक-प्रतिमांचा विध्वंस जाणीवपूर्वक घडवून आणला जातो. मेंदूत कळकट विचार पेरले जातात आणि धार्मिक घोषणांच्या गोंगाटात मानवी भावविश्वाला हादरे देणाऱ्या अविवेकी मळवट माखला जातो. दंगलीत समाजाची सौहार्दपूर्ण भाषा बदलते. आवेगाच्या किंकाळ्या, अख्खे गाव दहशतीने पोखरले जाते. समाजातील समन्वयाच्या, एकोप्याच्या परंपरा दुबळ्या होत जातात आणि अफवांची अदृश्य सुरी मानेवर फिरू लागते. विसंवादी रक्त भळभळते चांगुलपणा बाजूला पडतो, समूहांची भाषा आक्रमक बनत जाते. एका रात्रीत गावाला फाटाफुटीचा शाप लागतो आणि आजवर शांत असलेले गाव सालोसालच्या तंटा-बखेड्यात ओढले जाते. कुटिल कारस्थाने, अफवांची घाण, मूर्खपणाची वावटळ वाढत जाते. गावाला पोलि‍सांचा गराडा पडतो. हल्लागुल्ला, पळापळ, आरडाओरडा, सायरनचे आवाज, पकडापकडी सुरू होते. धार्मिक व्देष निर्माण करून मुद्दाम सामाजिक वातावर बिघडवून धार्मिक दंगली कशा घडवल्या जातात, ते या कवितेत अचूकपणे टिपले आहे.
असे वातावरण पाहून कवी अस्वस्थ होत जातो. आपण आजवर नुसत्याच सामाजिक कविता लिहिल्या त्या फाडून टाकाव्यात की आपणही दगडफेकीत सामील व्हावे अशी त्याची तीव्र प्रतिक्रिया होते. कवी असला तरी तो एक सामाजिक माणूसच आहे, हे भान कवी येथे व्यक्त करतो. मात्र हे सारे निवळल्यानंतर पुन्हा शांतता निर्माण होईल असा आशावादही शेवटी कवी व्यक्त करतो. त्यासाठी कवी ‘मंदिरावरच्या कबुतराचा थवा मशि‍दीच्या घुमटावर येऊन विसावतो.’ अशी प्रतिमा वापरतो.
‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद या कवितेत सुरक्षिततेसाठी प्रत्येक समाज कसा आपल्या जातीच्या ‘कळपात आसरा शोधतो, ते सांगितले आहे. ‘कळप सापडल्यावर संपते शोधयात्रा, अवघडलेली कामं तडीस नेण्यासाठी लागू पडते आडनावांची मात्रा असे समाजाचे वर्तन असते. एकीकडे असे ‘सजातीय आहेत, तर दुसरीकडे दुसऱ्या जातीचा तीव्र द्वेष करणारे स्वत:च्या जातीच्या तलवारी उपसून जातीसाठी आंधळे झालेले ‘जात्यंध’ही आहेत. वृत्तपत्रे आणि वाहिन्या तर उलट अशा जात्यंधांना चर्चेला बोलावून पूर्वग्रह पसरवण्याची संधी  देतात. अशी जातींची घालमेल बघताना कवीही अस्वस्थ होतो, श्वासांशी असलेली बांधिलकी तुटते आणि शब्दांशी फटकून वागण्याचा त्याचा निर्णय होतो. त्यातूनच ‘हे जगणं आपलं आहे, की आश्रयदात्यांचं ते तरी ठरावं असे कवीला वाटते. समाजकंटकांना मात्र यांच्याशी काहीही देणंघेणं नसतं. ते धर्माचा खेळ खेळू लागतात आणि बहुसंख्य अल्पसंख्यांकाला छळू लागतात. हे सारे सुरक्षिततेच्या साठी तयार झालेल्या ‘कळपवादामुळे’ घडून येत असतं असे कवी म्हणतो. समूहमनाच्या आंतरिक प्रक्रियांमागील मानसशास्त्रीय मीमांसा कवी येथे करतो.      
मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना या कवितेत गावातील सामाजिक वातावरण दूषित झाल्यामुळे अस्वस्थ  झालेल्या कवीचे मनोगत आले आहे. पूर्वीसारखी भुकेल्याला आपल्या गाठीची शेव देणारी माणसे, सौजन्य आता गावात राहिले नाही. शेतशिवार, वेशी, घरदार- सारे गैरसमजाने भरलेले असून संवादात पासंगभर जिव्हाळा राहिला नाही. सुडाच्या जखमांवर खपल्या धरल्या जात नाहीत. गावात गटतट, प्रतिशोध, खुन्नस आहे; आणि हे कवीच्या आवाक्यापलीकडील आहे. उलट कवी आणि त्याचे घर गावाच्या षडयंत्राच्या केंद्रस्थानी आहे. त्यातून ‘मी जखमच झालो आणि जखमा माझ्या झाल्या अशी कवीची भावना होते.
आणखी वाईट हे की मोहल्यात काळजीने विचारपूस करणारेच कवी विरूद्धच्या प्रत्येक कटात सामील असतात. ‘तोंडावर गोड बोलतात अन् माघारी हल्ला चढवतात, असे त्यांचे वर्तन असते. तरीही कवी काही निषेध करत नाही. कारण उत्पनाची सर्व साधने या बहुसंख्य लोकांच्या हातात असल्याने त्यांच्या ‘साधनासमोर नमतं घ्यावं’ हा समजूतदारपणा तो पाळतो. अशा वातावरणात कवीच्या दोन भाषा-मातृभाषा उर्दू व व्यवहार भाषा मराठी आणि दोन संस्कृतीही – मुस्लीम व हिंदू इतरांच्या कौतुकास पात्र होत नाही. मात्र असे उन्मळून पडल्यावरही याच अस्वस्थतेतून कवीच्या पदरात ‘कवितेची देणगी’ पडते. ‘मोडतोडीनेच शिकवली डागडुजीची कला’ अशी त्याच्या कवितेच्या निर्मितीची प्रक्रिया सांगितली आहे. त्यामुळे कवितेचा पाया भक्कम होतो, कविता कल्पनाविलासी न होता वास्तववादी होत जाते, असे कवीचे मनोगत येथे आले आहे.  
‘मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ या कवितेत पशुपक्ष्यांबद्दल भूतदया बाळगणाऱ्या गावात दंगलीनंतर कसा विपरित बदल होतो त्याचे चित्रण आले आहे. गावातील वाड्यात आधी ‘दिवसभर, पाखरे, चिमण्या, साळुंकी कावळे, वेगवेगळे पक्षी, पोपटांचा थवा’ येत असतो आणि त्यांच्या किलबिलाटांनीच कवीचे ‘खडकाळ जगणे आणि कविता ओलसर’ म्हणजे निर्मितिशील होते. शांततेची कबुतरे अजानच्या पार्श्वभूमीवर अंगणात दाणे टिपायला लागतात, तेव्हा कवीचे मन अल्लाहशी जवळीक साधू लागते.
म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्यासाठीही सामाजिक सौहार्द आणि जंगलावाचनाची म्हणजे निसर्ग-पक्षी यांच्याशी संवादी राहण्याची गरज असते असे कवीला सुचवायचे आहे. ‘उपाशी कावळ्याला चतकोर भाकरीचा  तुकडा देणे’ आणि ‘जखमी साळुंकीच्या पावलाला लेकरू समजून मलम लावणे अशा भूतदयेच्या संस्कारातूनच इतर समाजातील माणसांशीही सहिष्णुतेने वागण्याची प्रेरणा निर्माण होते आणि तीच ईश्वर-अल्लाच्या जवळ जाण्याची, त्याला प्रिय होण्याची पायरी आहे, असे कवीला सुचवायचे आहे. परंतु माणूस मतलबी आहे. तो षडयंत्र रचून, जंगलसंस्कृतीचे नियम धाब्यावर बसवून सावज हेरतो, प्राण्यांचीही शिकार करतो आणि माणूसकीचीही हिंसा.  
प्राणिमात्रांच्यावर प्रेम आणि मानवी सहिष्णुता हाच अल्लाच्या कृपेचा मार्ग असल्याने एक फकीर खाटकाकडून हाडके गोळा करून स्वत:साठी डाळरोटी नाकारून दर्ग्यातील कावळ्यांना खाऊ घालतो आणि उरलेले तुकडे मोकाट कुत्र्याला देतो. या साध्या कृतीतून दर्ग्यात ‘दातृत्वाला उधाण आणि ‘ आग्रहाला भरती येत जाते; पण दंगल घडते आणि सारेच बदलते. दंगलीत दयाळू फकिराचा जीव गेल्यावर दर्ग्यातल्या झाडांवर कावळे दिवसभर नुसते बसून राहतात आणि नंतर तिकडे फिरकतही नाही. केवळ माणूसच नव्हे तर पाखरेही पोरके होतात. त्यामुळे गावात आता पूर्वीसारखे कावळे येत नाहीत. पोपट, बगळे आणि चिमण्याही हद्दपार होतात; कारण दंगलीनंतर गावाच्या दातृत्वाला ओहोटी लागलेली असते. इकडे गावालाही डिजिटल शहरांची ओढ लागते. सहिष्णु, उदार अशा गावाची दंगलीनंतर एकूण संस्कृतीच बदलते. गावाला शहराच्या डिजिटल संस्कृतीची ओढ निर्माण होते. नागरिकरणाच्या व आधुनिकतेच्या रेट्याने सामाजिक विसंवाद वाढतो आणि सहिष्णुता धोक्यात येते, हे कवीने दाखवले आहे. मात्र सारेच काही बदलले नाही. अजूनही कवीला अशा आहे; पाळलेला पोपट मरण पावल्यावर आयुष्यभर फलाहार नाकारणारा एक बुजुर्ग गावात असून तो अजूनही पाखरांच्या आणि रानावनांच्या कहाण्या सांगत असतो; तेव्हा ‘मोहल्ल्यातली कातरवेळ आसवांत चिंब भिजते’ असे कवीला वाटते. इथेही कवितेचा शेवट कवी आशावादी पद्धतीने करतो.
अशा प्रकारे अजीम नवाज राही यांच्या कवितेच्या आशयसूत्रांचे विवेचन करता येते.   
3. ४. अजीम नवाज राही यांची भाषाशैली
विद्यार्थी मित्रांनो, आशयाचा विचार केल्यानंतर आता आपल्याला कवी अजीम नवाझ राही यांच्या कवितेच्या शैलींचा अभ्यास करावयाचा आहे. कवितेची शैली ही कवितेतून प्रकटणाऱ्या भाषेतील शब्द व प्रतिमा यांच्या आधारे शोधता येते.  आपण व्यवहारात जी भाषा वापरतो तिचा हेतू, संवाद आणि व्यवहार पूर्ण करणे हा असतो. त्यामुळे त्यातील वाक्यांच्या व शब्दांचा अर्थ एक आणि एकच अभिप्रेत असतो. मला ‘कोल्हापूरची दोन तिकिटे द्या या वाक्याचा एकच अर्थ प्रकटल्याशिवाय कंडक्टर व प्रवासी यांतील व्यवहार पूर्ण होणार नाही. उलट ‘एक तुतारी द्या मज आणुनि’ या केशवसुतांच्या ओळीत केवळ ‘तुतारी आणून देणे एवढाच अर्थ नाही. इथे ‘तुतारी’चा ‘विशिष्ट प्रकारचे वाद्य एवढाच अर्थ नाही, तर ‘समाजातील भेदाभेद, परंपरा-रूढी यांची बंधने, स्वातंत्र्याचा संकोच, समतेचा अभाव मला मान्य नसून त्या विरुद्ध कवी मला सांस्कृतिक युद्ध पुकारायचे आहे’ असा व्यापक आहे. ही अर्थाची व्यापकता कवितेत शब्दांच्या प्रतिमांमुळे येते. म्हणजे कवितेतील भाषा कवितेत व्यवहारातील शब्दांचा वापर ‘प्रतिमा म्हणून करत असते. ती ‘प्रतिमा’ असते म्हणून तिला अनेक अर्थ असतात. अशी अनेकार्थकता, व्यवहारातल्या वाच्यार्थ्यापेक्षा वेगळा व्यापक, विस्तारित, ‘व्यंग्यार्थ हाच कवितेचा आत्मा असतो. हीच कवितेची सार्थकता व महात्मता असते. त्यामुळे व्यवहारातील शब्द व भाषा हे कवितेत कसे सर्जनशील रूप घेते त्याचा शोध घेणे म्हणजे कवितेची भाषाशैली अभ्यासणे होय.    
आता आपल्याला अजीम नवाझ राही यांच्या पाचही कवितातल्या शब्दांचा अभ्यास करून भाषाशैली शोधायची आहे.
‘दुष्काळ: काही दाहक संदर्भ’ या कवितेत सुक्या दुष्काळानंतर गावाचे, शेतीचे आणि त्यातील माणसांचे विदारक दर्शन घडवते. मात्र त्याची विदारकता कवीने वापलेल्या प्रतिमांमुळे अधिक गडद होते. उदा. ‘हंगामाविषयी उच्चारू नको शब्द, गर्भारते उद्याची काळजी, ‘तुझ्या डोळ्यांत निद्रेची पालखी, येण्याच्या वाटा गजबजल्या आक्रोशाने अशा वाक्यरचनांमुळे अनुक्रमे शेतकरी आणि गुरे यांची दारुण अवस्था साकार होते. ‘घरे उदासवाणी कळा पांघरून, वस्त्या प्रश्नांकित काळोखात बुडाल्या खोल, ‘पारावरच्या म्हाताऱ्याकुताऱ्यांच्या चर्चा गप्पा, क्षीण डोळ्यांत भाकरीची आकृती अशा रचनांमुळे दुष्काळाचे घरातील, गावातील माणसांवर आणि जुन्या जाणत्या पिढीवरही काय भयावह परिणाम झालेले आहेत, ते कळते.
केवळ रचनाच नव्हे, कितीतरी नव्या प्रतिमा व शब्द यांची योजना कवीने केलेली आहे. आतडे पिळवटणारी गाथा, धुकाळून रानवाटा, ‘धास्तीची पेरणी, ‘चतुर ज्योतिषाची रिकामी झोळी, दुष्काळ चेहरा अशा नव्या प्रतिमांमुळे कवितेतील ग्रामीण अवकाश व दुष्काळाची तीव्रता अधिक समर्पक होत जाते.
‘जातीय दंगल: १२ भानगडींची १३ वळणे या कवितेत ‘गढूळलेलं पाणी पूर येण्याची शक्यता वर्तवतं’, ‘बेकरीसारख्या धगधगणाऱ्या मेंदूतून’, ‘प्रतिमा प्रतीकांच्या विटा निखळायला होते सुरुवात’, ‘वातावरणाच्या कागदावर घुमतात भाषेच्या किंकाळ्या, ‘दंगल म्हणजे वडिलोपार्जित सौजन्याचा मोडलेला कणा’- अशा रचनेतून दंगलीचे वास्तव नेमकेपणाने व्यक्त होत जाते. ‘माणुसकीचे व्याकरण, धास्तावलेली पाखरे;, एकोप्याच्या मानेवरून; ‘जातविरहित सौजन्य, ‘वाक्यांची झाडे, ‘ऋणानुबंधाचा ढासळलेला कणा’, ‘सूर हरवलेला सलोख्याचा पावा अशा कितीतरी नव्या शब्दांची रचना करून कवीने दंगलीनंतरचे दहशतीचे, असुरक्षितेचे वातावरण समर्पक वर्णन केले आहे.
 ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद, या कवितेत ‘आपुलकीच्या मजारीवार आहे बिरादरीचा ग्लाफ’, ‘सहानुभावांच्या दगडांवर जातीयतेचा शेंदूर या रचनांमधून मुस्लीम आणि हिंदू यांच्या मूळ सहिष्णु धर्मात नवी विद्वेषाची पेरणी कशी झाली आहे, ते अचूकपणे सांगितले आहे. ‘सुकलेला भोपळा जमिनीवर आदळावा अन् बियांची व्हावी पांगापांग अशा रचनेतून कवी आपल्या मनातील विचारांचा विस्कळीतपणा सांगतो. ‘मोहोळ हुलवणाऱ्यांना नसते मधमाशा बेघर झाल्याची खंत असे म्हणत समाजकंटकाचे निर्दयी मन व्यक्त करतो. या शिवाय ‘प्रश्नचिन्हांची कफनी, ‘कपाळ करंटी दैनंदिनी, ‘जळूची वंशावळ ‘बिरादरी असणारे सजातीय, ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद  अशा नव्या प्रतिमा-संबंध योजना करत ते दूषित सामाजिक वातावरण कवितेत  अधिक गडद करत जातात.
‘मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना’ या कवितेतही ‘भुकेल्याला गाठीची शेव देणारी माणसं’ अशा रचनेतून गरीब माणसांजवळ असलेली दयेची व सहिष्णुतेची भावना व्यक्त केली आहे, ‘गैरसमजाच्या केरकचऱ्यांनी खचाखच भरले सामाजिक मूल्यमापनाचे नितळ डोळे असे म्हणत अफवा व गैरसमजुतीने मुस्लिमांबद्दल समाजाचा दृष्टिकोन कसा बदलतो हे मार्मिकपणे व्यक्त केले आहे. ‘खुन्नसखोर शब्दांनी बांधली जि‍भांच्या शेंड्यावर घरटी अशी ओळ कवीच्या सर्जनशील प्रतिभेची साक्ष पटवते. आधी शब्दांनी द्वेष निर्माण केला जातो आणि मग दंगली घडवल्या जातात. म्हणजे आधी भाषा आणि नंतर कृती घडवली जाते.  ‘फिनिक्सच्या राखेचा टिळा, ‘अपमानाचा जहरी खिळा, ‘लोळावं वेदनांच्या गुदगुल्यांनी, ‘जखमांना सारवलेली सबुरी अशी कितीतरी नवी प्रतिमासृष्टी कवी आपल्या कवितेत उभारत जातो. ज्यातून दोन समाजातील विद्वेषाचे आणि दुभंगलेपणाचे वातावरण अधोरेखित करत जातो.
 ‘मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ या कवितेत ‘पेरल्या पक्षांनीच कवितेत माझ्या खडकाळ लकेरी गाण्यांच्या ओलसर असे म्हणत आपले ‘वाळवंटांसारखे खडकाळ आयुष्य कवितेनेच ओलसर केले आहे’ असे सांगत कवितेच्या निर्मितीविषयीची कृतज्ञता व्यक्त झाली आहे. ‘असते ज्यांना जंगलवाचनाची सवय वागतात ते वस्त्यांत सौजन्यशीर अशा रचनेतून निसर्गाशी एकरूपता हाच मानवी माणुसकी जिवंत ठेवण्याचा सांधा असतो ते सांगितले आहे. ही कविता वैचारिक आणि तात्त्विक असली तर ती प्रचारी व बोजड होत नाही त्याचे कारण राही यांची अशी शैलीच होय. ‘मन व्यावहारिक धुक्यात वेढलेलं असणे, ‘बीजे षडयंत्राची पेरणे, ‘बक्षीस म्हणून चोचभर दाणे मिळवणे’, ‘खैरातीत डाळरोटी नाकारणे असे कितीतरी वाक्प्रचारही राही यांनी कवितेत घडवले आहेत. ‘उंबऱ्यावर जळालेली घरे, ‘ओसरलेले दातृत्वाचे उधाण, ‘लागली आग्रहाला ओहोटी अशा शब्दयोजनेतून दंगलीमुळे सामाजिक सौहार्दाचे बिघडलेले वातावरण अचूकपणे सूचित केले आहे.
अंजली कुलकर्णी यांच्या मते, ‘अजीम नवाज यांच्या कवितेची भाषा उत्कटतेनं भरलेली आहे. तिच्यात प्रचंड आवेग आहे. कवी आपल्या आतला सगळा कल्लोळ, आकांत आणि अशांतता शब्दा-शब्दांत ओततो. त्यामुळे त्यांची ही समस्त कविता संवेदनांनी भरलेली होते. ओसंडत्या वेदनेनं जणू कवितेचा कंठ दाटून येतो.  कधी स्वगतासारखी व्यक्त होते, तर कधी  गप्पा मारल्यासारखी बोलते. आशयघन, सुंदर, चपखल शब्दयोजना ती जपते.’ (अंजली कुलकर्णी : लोकसत्ता, १५ एप्रिल, २०१८)
अशाप्रकारे नवी वाक्यरचना, नवे शब्द, नव्या प्रतिमा, नवे वाक्प्रचार, नवे शब्दसंधी यांनी अजीम नवाझ राही यांची भाषाशैली समृद्ध आहे.   
 समारोप
अजीम नवाझ राही यांच्या एकूण पाच कविता त्यांच्या तीन वेगवेगळ्या कविता संग्रहातून घेतलेल्या आहेत. हे तीन कविता संग्रह वेगवेगळ्या साली लिहिले गेले आणि त्यातून प्रकटणारा आशय भिन्न भिन्न असला तरी काही समान सूत्रे त्यांच्या कवितांत आढळतात. या पाचही कवितांमधून कवीचे धर्माने मुस्लीम अल्पसंख्यांक असणे, त्याचे असुरक्षित जगणे, त्याचा मोहल्ला आणि त्याचा गाव यांतील संस्कृतीतील एकूणच संस्कृती, आणि बहुसंख्यांकांच्या धर्म-जातीचे अल्पसंख्यांक समुदायावर असलेले दडपण, दहशत व भीती प्रकटताना दिसते. धर्मव्देष, जातिद्वेष आणि धार्मिक दंगली यांमुळे मोहल्ल्यातील सामाजिक सलोखा कसा उद्ध्वस्त होतो आणि गावाची सहिष्णुता, भूतदया ही मूल्येही कशी बदलत गेलेली आहेत. सनातन त्यागाच्या व समतेच्या मूल्यांकडून गावही आता कसे शहरी डिजिटल संस्कृतीकडे वळत हिंसा आणि क्रौर्य मूल्यांकडे वळत चालले आहे, त्याच शोध या कवितेत आहेत. मात्र शेवटी कवीला हा तुटलेला सामाजिक-धार्मिक सलोख्याचा धागा पुन्हा जोडला जाईल हा आशावादही त्यांच्या कवितेतून प्रकटताना दिसतो. हे सारे साकारण्यासाठी ही समर्पक अशी सर्जनशील शैली त्यांच्या कवितेने घडवली आहे.
अशाप्रकारे अजीम नवाझ राही यांच्या कवितेची आशयसूत्रे सांगता येतात.
कल्पना दुधाळ यांची कविता
विद्यार्थी मित्रांनो, अजीम नवाज राही यांच्या कवितेचा आशय व शैली अभ्यासल्यानंतर आता आपण  कवियित्री कल्पना दुधाळ यांची कविता अभ्यासणार आहोत. त्यासाठी त्यांचा आधी परिचय करून घेऊ.
§  कल्पना दुधाळ यांचा परिचय
कल्पना दुधाळ (१९७८) या नव्वदनंतरच्या मराठी कवितेतील महत्त्वाच्या कवियित्री असून ग्रामीण आणि देशीवादी अशा दोन्ही जाणिवांच्या कविता त्या लिहित आहेत. सोलापूरच्या टेंभूर्णी येथे शेतकरी कुटुंबात जन्म. सध्या बोरीभडक ता. दौंड, जि. पुणे येथे वास्तव्य. पुण्यात पदवी शिक्षण घेत असताना कवितांचे लेखन सुरू केले. ‘सीझर कर म्हणतेय माती’ या पहिल्याच कवितासंग्रहाला सुमारे १३ पुरस्कार लाभले आहेत. ‘धग असतेच आसपास’ हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. त्यांच्या कवितांचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झाले असून साहित्य अकादेमीच्या विविध उपक्रमातही त्यांचा सहभाग झाला आहे. त्यांना आजवर बहिणाबाई चौधरी साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार असे विविध मानाचे सन्मान प्राप्त झालेले आहेत.
§  कल्पना दुधाळ यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व कविता
कल्पना दुधाळ यांच्या कवितेत शेतकऱ्यांचे दु:ख, शेतीच्या समस्या  दुष्काळ, ग्रामीण जीवन, ग्रामीण स्त्रीचे कष्ट, स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध, ग्रामीण संस्कृती व नातेसंबंध लोप पावत चालल्याची खंत आणि देशीवादी जाणीव प्रकटते. डॉ. देवानंद सोनटक्के यांनी म्हटल्याप्रमाणे दुधाळ यांच्या कवितेत स्त्रीवादी जाणीव, भूमी आणि स्त्री यांच्या सर्जनाची एकात्मता आढळते. ‘शेती आणि निसर्गावरील आक्रमण कवयित्रीला वेदनादायी आहे. हरितक्रांती आली आणि भारतीय शेती मुळातून बदलली. पण या बदलाने शेतकऱ्यांचे भावविश्व आणि जीवनविश्वही बदलून गेले. अधिक नफा, अधिक फायदा, अधिक उत्पादन या नादात कृषिसंस्कृती बदलली याचे दु:ख कवयित्रीला वाटते.’ (देवानंद सोनटक्के, प्रस्तावना, सीझर कर म्हणतेय माती, पृ. १७) म्हणजे दुधाळ यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वात अस्सल भारतीय मूल्ये व परीघ आहे. आधुनिक जीवनाच्या मूल्यांपेक्षा आपल्या संस्कृतीतील देशीवादी उच्चमूल्यांतूनच सांस्कृतिक दुभंगलेपण जोडू शकतो अशी जाणीव त्यांच्या कवितांतून प्रकटत जाते.    
 विवेचन 
मित्रांनो, आपल्या अभ्यासक्रमात दुधाळ यांच्या ‘बाय आणि गाय, ‘झुलत्या फांदीला गं, ‘घोषणा’, ‘खस्ता आणि ‘धग असतेस आसपास या पाच कविता समाविष्ट आहेत. शेती आणि गावगाडा ही ग्रामीण कवितेत सामान्यपणे असलेली केंद्रे याही कवितेत आहे. मात्र सोबतच त्यांची ग्रामीण स्त्री स्वत:च्या अस्तित्वाचा शोध सुद्धा घेते, हे महत्त्वाचे सूत्र या कवितेतून प्रकटते.
‘बाय आणि गाय या कवितेत ग्रामीण स्त्रीचे आणि गायीचे जगणे यांचा शोध घेत स्त्रीच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न उपस्थित केले आहे. आपल्या गायीसाठी स्त्री दुसर्‍याच्या बांधावरचं गवत कापते, तेव्हा तिच्या घरच्या गायीचा विचार न करता शेताचा ‘मालक’ कापलेले सर्वच गवत हिसकावून घेतो. जेव्हा गाय गवतात नेऊन बांधली जाते तेव्हा ‘रान तुडवतंय म्हणून’ हाकलून लावतात. त्यामुळे मातीला, गायीला आणि स्त्रीला तिच्या मालकाच्या विरुद्ध जाण्याचा अधिकार नाही; तिघीही मालकाच्याच दावणीला बांधलेल्या आहेत, असे कवयित्रीला वाटते.
 पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीला आणि मालकप्रधान शेती व्यवस्थेत मातीला, गायीला स्वातंत्र्य नाहीच. उलट उपयुक्तता हाच त्यांना निकष लावला जातो. ज्या दिवशी ‘माती नापीक होते आणि  गाय व बाईची उपजाऊ क्षमता  संपते, त्या दिवशीच त्यांची किंमत कमी होते. त्यांना स्वातंत्र्य नाही आणि त्यामुळे व्यवस्थेविरूद्ध विद्रोह करण्याचे बळ नाही. म्हणून माती नापीक झाली की, ‘पडिकात कुणी फिरकत नाही’; गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव असूनही शेवटी मेल्यावर ‘कावळ्या-कुत्र्यांच्या हवाली’ केलं जातं; तर स्त्रीला ‘पंचनामा, पोस्टमार्टेम, विद्युतदाहिनी यांपैकी एकात अंत्यसंस्कार होतो. त्यामुळे मुक्तीसाठी ‘कित्येक शतकापासून गाय आणि बाय धावत’च आहेत असे कवयित्रीला वाटते.
मी पहिली वाट…कुणीतरी येईल म्हणून
…पण ही तर बिनपाण्याची विहीर
कुणी साधं डोकावलं नाही
हिसका देण्याएवढं बळ राहिलं नाही
तोंडाला फेस आला
असे गाय बाईला सांगते. त्यावेळी भाकड गायीलाही विहिरीतच ढकलून दिले जाते आणि बायीलाही, ही पुरुषीवृत्ती दिसून येते. त्यामुळेच ‘धग असतेच आसपास या कवितेतही कवयित्री ‘आत्महत्येला निमंत्रण दिलेल्या विहिरीला’ अस उल्लेख येतो. या दोन कवितांमधून कवियित्रीच्या स्त्री-अस्तित्वविषयक जाणिवा प्रकटल्या आहेत.  
‘झुलत्या फांदीला गं, या कवितेत एका किशोरवयीन ग्रामीण शाळकरी मुलीचे अल्लड व निरागस  जीवन त्यात रेखाटले आहे. झावळ्या, शिंदोळ्या, चंदन, कणसं अशा शिवारातल्या शाळेत तिला जे स्वातंत्र्य आहे. ते ‘वढ्याच्या पल्याड व लोखंडी कावड असलेल्या शाळेत नाही, त्यामुळे ती शाळा तिला कोंडवाडाच वाटतो आहे. एकीकडे ती रानाच्या शाळेत रमते तर दुसरीकडे भिंतींच्या शाळेत शिकते. त्यांची तुलनाही ती स्वाभाविक करते. त्यामुळे मोकळ्या रानात तिच्या व्यक्तिमत्त्वाचे झाड फुलत-वाढत असते. मात्र  ‘कौले आणि लोखंडी कवाड’ असलेल्या शाळेत ‘ सजवू कसं मी छाटल्या झाडाला’ असा तिला प्रश्न पडतो. आधुनिक शिक्षणाने स्त्रीच्या भोवती नवी बंधने उभी केली आहेत. असे देशीवादी आकलन कवयित्री मांडत जाते.  
‘घोषणा’ या कवितेत भारतीय स्वातंत्र्याचा लाभ खेड्यातील स्त्रियांपर्यंत अजूनही न पोचल्याची खंत व्यक्त होते. वर्गातल्या इतर मुली प्रभात फेरीत फिरत असताना शेतकर्‍याची गरीब मुलगी मात्र चार बिस्किटांच्या पुड्यांसाठी ‘जय जवान जय किसान’ घोषणा देत अनवाणी पायाने फुफाट्यात फिरत जाते. तिचा भाऊही सैन्यात शहीद होतो. तेव्हा तिला जवानाचे आणि शाहिदाचे बलिदान सारखेच आहे, याचा साक्षात्कार होतो.
दुसरीकडे ही कविता गरीब व श्रीमंत यांतील भेदाची दरीही व्यक्त करते. प्रभातफेरीच्या निमित्ताने ते स्पष्ट होते. एकाच वर्गात काही मुली, ‘पांढरे शुभ्र बूट, मोजे, नवे कोरे गणवेश, केसांना रिबिनी आणि त्यांचे नखरे’ अशा  आहेत; आणि त्याचवेळी अनवाणी पायांनी कचऱ्याच्या ढिगात पाय घुसवत चार बिस्किटांसाठी प्रभातफेरीत फिरणारी मुलगीही आहे; जिला उन्हाळ्याच्या फुफाट्यापासून बचावासाठीही चप्पल मिळत नाही. तिला करंजाची पाने बांधावी लागतात. मात्र तिचाच भाऊ सैन्यात शहीद होतो. म्हणजे श्रीमंतांची देशभक्ती प्रभातफेरीपुरती आणि घोषणांपुरती असते तर गरिबांची मात्र बलिदानासाठी; अशी सामाजिक विसंगतीही कवयित्री दाखवून देते.  
 ‘खस्ता या कवितेत आपली मुलाच्या शिक्षणासाठी खस्ता खाणाऱ्या स्त्रीचे मनोगत व्यक्त होते. आपल्या  उनाड मुलाच्या तक्रारी हाताबाहेर गेल्यावर त्याला वसतिगृहात ठेवायचा निर्णय होतो, मात्र मातेचे मन काळजीने पोखरते. कारण ‘ ढीगभर सूचना सामानात भरताना, कधी नव्हे ते सगळं ऐकून त्याच शांत शांत बसणं’ तिला जड जाते. त्याची आठवण तिला खायला उठते आणि कोणत्याही आईबापांनी लेकरासाठी खाल्लेल्या खस्ता वाया  जाऊ नये म्हणून प्रार्थना करते.
श्रीखंड-पुरीने भरलेले ताट असूनही मुलाच्या आठवणीने माउलीच्या पोटात खास जात नाही. आपलं उनाड पोरगं आठवत राहते. आपणच तक्रार करून त्याला शिस्त लागावी म्हणून वसतिगृहात ठेवले आणि त्याची बॅग भरत, त्याला सूचना देत त्याची पाठवणी करते. वसतिगृहात जातानाची मुलाच्या मनाची घालमेल आणि  गेल्यानंतरची आईची घालमेल असे द्वंद्व या कवितेत टिपले आहे.
 ‘धग असतेस आसपास या कवितेत पुन्हा स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध आहे. तिला आयुष्यात कायमच नकार, अवहेलना वाट्याला येते तरी ती जगण्याला नकार देत नाही. ‘गाभाऱ्यात प्रवेश नसला तरी देवपूजा’ करते. होरपळणारे वास्तव वाट्याला आले तरी आत्महत्या करत नाही. भूमीशी असलेले तिचे सृजनशील नाते ती तोडत नाही. कारण ‘चार चिमुकले हातच तिला शहाण्यासारखे बळ देत जाते; आणि ‘वस्तूंसारखी माणसं बदलता येत नाहीत, धग रक्तात असते, ती शोषून संपत नाही अशी जाणीवही तिला होते. एखादी लहानशी ठिणगीही पुढच्या स्फोटाला पुरेशी ठरावी इतकी धग आपल्यात आहे याचा तिला साक्षात्कार होतो. कसा होतो हा साक्षात्कार?
पुरुषप्रधान व्यवस्थेत स्त्रीला स्वातंत्र्य नाही. तिला धार्मिक व्यवहारात गुंतवले जाते; पण धार्मिक स्वातंत्र्य दिले जात नाही. आयुष्याची शर्यत मात्र तिच्याच मागे आहे. त्यात तिला अनेकांना नैराश्य येत जाते, मात्र आपणही जामिनीसारखे नवे सृष्टीचे सर्जन करत असतो. त्यामुळे नुसते स्त्रीत्व जाचक असले तरी मातृत्व मात्र ‘स्वत:च्या सावलीसारखे अभिन्न आहे. आपल्यातच ‘आप’ (जल-पाण्याचा अंश), ‘तेज (धग), ‘वायू (वादळ), ‘पृथ्वी(भूमी) आणि ‘आकाश’ (वाफ) ही पंचतत्त्वे सामावलेली आहेत असा तिला साक्षात्कार होतो. सृष्टी तत्त्व, निसर्ग तत्त्व आणि आपण एकरूपच असून आपल्यातच निर्मितीचे ‘सुंदर क्षण’ आहेत  याची जाणीव टिळा होते आणि त्यातून  स्त्रीच्या अस्तित्वाचा साक्षात्कार टिळा होतो. कल्पना दुधाळ आपल्या कवितेत स्त्री अस्तित्वाचा शोध घेत असल्या तरी त्या पाश्चात्य स्त्रीवादी नाहीत; तर भारतीय स्त्रीवादी कवियित्री आहे. त्यामुळे त्यांची कविता जहाल स्त्रीवादाशी नाते सांगत नाही, तर मवाळ स्त्रीवाद व्यक्त करते नाते सांगते, हेही लक्षात घेतले पाहिजे.
अशाप्रकारे कल्पना दुधाळ यांच्या कवितेचे विवेचन करता येते.
§  कल्पना दुधाळ यांची भाषाशैली
ग्रामीण आणि देशीवादी परिसराशी संबंधित प्रतिमाविश्व व स्त्री-सापेक्ष शब्दयोजना हा  कल्पना दुधाळ यांच्या भाषाशैलीचा विशेष आहे. ‘कृषिकेंद्रित प्रतिमाविश्व आणि भाषिक रूपे हा या कवितेचा महत्त्वपूर्ण विशेष आहे.’ असे निरीक्षण एकनाथ पाटील यांनी नोंदवले आहेच. (एकनाथ पाटील, प्रस्तावना, काव्यगंध,  शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, पृ. ३५)
‘बाय आणि गाय या कवितेत ‘रवंथाबरोबर दातही विरघळून गेले, ‘हिसका देण्याएवढं बळ राहिलं नाही’, ‘जन्मभर दावणीला बांधलेलो अशा वाक्यरचनेतून स्त्रीचे, गायीचे जगणे व गुलामी सूचित केली आहे. ‘शरीरातून शरीर बाहेर पडणं, ‘रुजव्याची माती नापीक होणं’ ‘चढणीची आडवाट उरकता उरकत नाही अशा शब्दयोजनेतून अनुक्रमे स्त्री, माती आणि गाय यांच्या अवस्था सूचित केल्या जातात. तर ‘चिकटलेले रक्तपिपासू गोचीड’, ‘घोंघावणाऱ्या गोमाशा यांतून पुरुषी प्रतिमा सूचित केल्या आहेत.  
‘झुलत्या फांदीला गं या कवितेत किशोरवयीन अल्लड मुलीचे मनोगत आले आहे. त्यासाठी कवितेच्या ओळीही त्याला संवादी अशा लहान लहान वापरल्या आहेत शिवाय त्यात ‘झावळ्या वाकल्या गं, शिंदोळ्या पिकल्या, चंदन चावून गं, जिभल्या रंगल्या’ अशा लोकगीतसदृश्य ओळी वापरल्या आहेत. ‘कौलाचं आभाळ, लोखंडी कवाडं’ अशा प्रतिमांमधून शाळा नावाच्या आधुनिक व्यवस्थांनीही स्त्रीचे देशी स्वातंत्र्य बाधित केले आहे. हे सूचित केले आहे.  
‘घोषणा’ कवितेत ‘नवे कोरे गणवेश, ‘करकरीत रिबिनी लावलेल्या मुली एकीकडे आणि ‘चार बिस्किटांसाठी गावभर फिरणाऱ्या, ‘कारंजाची पानं पायाला बांधून शेळ्यांच्या मागे जाणाऱ्या मुली दुसरीकडे असे भारतीय स्वातंत्र्याचे अपयश या विरोधी रचनांमधून बेमालूमपणे सूचित केले आहे. ‘खस्ता कवितेतील आईचे  स्वत:लाच कुरतडून खाणारे मन नाकपुड्या फुगवत गिळतो आवंढा, तोंडातच फिरतात घास, ‘ढीगभर सूचना सामानात भरताना अशा शब्दांत व्यक्त होते. आणि ‘धग असतेस आसपास धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक बंधने आणि दुसरीकडे त्या विरुद्ध बंड करू पाहणे मन हा सूक्ष्म संघर्ष व्यक्त करण्यासाठी साधी स्वत:ची सावली सोडून पाळता येत नाही या अचूक शब्दयोजनेने सूचित होतो. ‘आत्महत्येचे निमंत्रण’, ‘मुरमात खुरपं घुसल्यागत अशा शब्दांतून स्त्रीच्या जगण्याची कोंडी सूचित केली आहे. ‘दरवेळी भाजतच असं नाही, पण धग असतेच आसपास असे म्हणत स्त्रीच्या आंतरिक ऊर्जेची व स्वातंत्र्य अस्तित्वाची जाणीव चपखलपणे व्यक्त केली आहे. 
समारोप
कल्पना दुधाळ या ग्रामीण कवयित्री असल्या तरी त्यांच्या कवितेत भारतीय मवाळ स्त्रीवाद येतो, त्यामुळे ग्रामीण स्त्रीचे दु:ख सांगत असतानाच त्या स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेत जातात. त्यातून सृजनशील असलेले भूमितत्त्व, स्त्रीतत्त्व आणि प्राणितत्त्व त्या शोधात जातात. पंचमहाभूते आणि निसर्ग स्त्रीत्वातच आहे, असा साक्षात्कारही त्यांच्या कवितेत येतो. तसेच एका वत्सल मातेचे मनही त्यांच्या कवितेत प्रकटत जाते. स्त्रीच्या कुमारी, पत्नी आणि मत अशा त्रिविध भूमिकांची संवेदनशीलता त्या कवितेत साकारतात. शिवाय स्वातंत्र्याची इतकी वर्षे होऊनही स्त्रियांची गुलामी नष्ट न झाल्याची खंतही त्या कवितेत व्यक्त करत जातात. आपल्या आशयाला अतिशय पूरक अशी त्यांची भाषाशैलीही त्यांच्या कवितेत येते आहे.      
 संदर्भ सूची
·       अंजली कुलकर्णी : लोकसत्ता, १५ एप्रिल, २०१८
·       एकनाथ पाटील, प्रस्तावना, काव्यगंध, दूर शिक्षण केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, २०१९
·       डॉ. देवानंद सोनटक्के प्रस्तावना, सीझर कर म्हणतेय माती, (दु. आ.) हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१४  
·       डॉ. किशोर सानप, अजीम नवाज राही,
शब्दार्थ व टिपा
§  जागतिकीकरण = जागतिक व्यापाराच्या संदर्भातील वस्तू-खरेदी विक्री करण्याच्या संदर्भातील जागतिक धोरण 
§  जात्यंध = जातिद्वेषाने आंधळा झालेला
§  धर्मांध = धर्मद्वेषाने आंधळा झालेला
§  अजान = मुस्लीम धर्मातील अल्लाची आळवणी करण्याची प्रार्थना
§  उपभोगवाद = भोवतालचे जग व वस्तू- व्यक्ती केवळ आपल्या उपभोगासाठी आहे मानणारी भोगवादी वृत्ती
§  वस्तुवाद = भोवतालच्या जगातील व्यक्तिपेक्षा वस्तु महत्त्वाच्या मानण्याची वृत्ती.
§  चंगळवाद = चंगळवाद म्हणजे पैशांचा अपव्यय. इतरांचा विचार न करता भरपूर खर्च करून चैन करण्याची उधळी वृत्ती.
§  डिजिटल संस्कृती = मानवी संस्कृतीच्या पलीकडची तंत्रज्ञानाची आभासी वास्तवाची संस्कृती
§  देशीवाद – ही एक विचारपद्धती आहे. माणूस, निसर्ग, त्याचा प्रदेश, त्याची मूल्ये त्या त्या भूभागांशी निगडीत असते, असे मानणारा व प्रागतिक आणि आधुनिक व्यवस्थांना विरोध करणारा हा एक वाङ्मयीन वाद आहे. 
§  स्त्रीवाद = स्त्रीवाद म्हणजे लिंगभेद झुगारून स्त्री-पुरुष समानतेकडे वाटचाल करणारा विचारप्रवाह आहे. सामान्यतः जरी स्त्रीवाद ही पुरुषविरोधी चळवळ समजली जाते. त्यामुळे ही स्त्रियांचे ऐतिहासिक दुय्यमत्व उजेडात आणून हे शोषण संपवण्याचा प्रयत्‍न करते. ही एक सामाजिक, राजकीय जाणीव आहे.
§  पंचमहाभूते = सांख्यदर्शन नावाच्या तत्त्वज्ञानानुसार  सर्व भौतिक जग, सजीव व निर्जीव पदार्थ, आपले शरीर पाच मूळ तत्त्वांपासून (द्रव्यांपासून) तयार झाले आहे असे मानतात, या पाच तत्त्वांना पंचमहाभूते असे म्हणतात. पृथ्वी, आप (जल), तेज (अग्नी), वायू, आकाश ही ती पाच तत्त्वे होत.
§  सामाजिक सौहार्द = समाजातील सलोखा.

स्वयं अध्ययनासाठी प्रश्न

§   वस्तुनिष्ठ प्रश्न
१.    अजीम नवाज राही यांच्या कवितेत ‘दाहक संदर्भ’ हा शब्दप्रयोग कोणत्या समस्येसंदर्भात आला आहे?
अ. स्त्री समस्या          ब. अस्पृश्यता      क. दुष्काळ      ड. दंगल
२.    ‘उपाशी उंदरांचा पेवात धुडगूस’ असा उल्लेख कोणत्या कवितेत आहे?
अ. ‘दुष्काळ: काही दाहक संदर्भ’    ब. ‘जातीय दंगल: १२ भानगडींची १३ वळणे         क. , ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद  ड. ‘मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना’
३.    जातीय दंगलीच्या रात्री कशाच्या विटा निखळायला सुरुवात होते?
 अ. मंदिराच्या     ब. प्रतिमा-प्रतीकांच्या    क. मशि‍दीच्या     ड. घरांच्या
४.    अस्वस्थ वातावरणातूनच माझी कविता जन्मास येते असे, कवीने कोणत्या कवितेत आहे?
अ. ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद   ब. ‘जातीय दंगल: १२ भानगडींची १३ वळणे क. ‘दुष्काळ:    
     काही दाहक संदर्भ’   ड. ‘मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना’
५.    ‘दोन भाषांचा प्रवास कौतुकास पत्र ठरत नाही, हे विधान कवीने कोणत्या दोन भाषांच्या संदर्भात केले आहे?
 अ. हिंदी-इंग्रजी    ब. उर्दू-मराठी    क. मराठी-हिंदी    ड. इंग्रजी-उर्दू
६.    ‘बाई गं, तू काय मी काय, जन्मभर दावणीला बांधलेलो हे वाक्य कोणी कोणास म्हटले आहे?
 अ. आईने-मुलीला    ब. सासूने-सुनेला  क. गायीने-बाईला   ड. बाईने-गायीला
७.     ‘कौलाचं आभाळ गं, लोखंडी कवाड हा कवितेतील उल्लेख कशाचा आहे?
 अ. मंदिराच्या गाभार्‍याचा       ब. सासरच्या घराचा   क. शाळेचा  ड. दर्ग्याचा
८.    स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कोणती घोषणा दिली जात असे?
 अ. स्वातंत्र्यदिन चिरायु होवो   ब. वंदे मातरम   क. भारतमाता की जय   ड. जय जवान-जय किसान
९.    कोणती गोष्ट वाया जाऊ नये अशी प्रार्थना सूर्यनारायणाकडे केली जाते? 
अ.   होस्टेलला भरलेले पैसे   ब. ताटातील अन्न  क. ढीगभर सूचना  ड. आई-बापांच्या खस्ता
१०. आपल्यात कोणता अंश लाटेसारखा उसळतो, असे कवयित्री म्हणते?
अ. पाण्याचा अंश      ब. धगीची ठिणगी  क. प्रेमाचा बहर   ड. स्त्रीचे दु:ख
            उत्तरे- १. क.        २. अ.             ३. ब.                ४.  ड.               ५. ब.                                     
                    ६.  क.        ७. क.             ८. ड.               ९. ड.                १०. अ.

§  थोडक्यात उत्तरे द्या
१.    अजीम नवाज राही यांच्या कवितेतील मोहल्ला व गावाचे चित्रण तुमच्या शब्दात लिहा.
२.    अजीम नवाज राही यांच्या कवितेतून प्रकटणाऱ्या कवी मनाचा वेध घ्या.
३.    अजीम नवाज राही यांनी कवितेत दुष्काळाचे चित्रण कसे केले आहे?
४.    जातीय दंगलीमुळे गावातील सामाजिक सलोखा कसा बिघडतो, ते ‘जातीय दंगल : १२ भानगडींची १३ वळणे या कवितेचा आधारे  स्पष्ट करा.
५.    जातीच्या कळपवादी भूमिकेमुळे गावाचे सामाजिक वातावरण कसे संशयाचे बनते ते ‘सुरक्षेची हमी देणारा कळपवाद या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
६.    ‘मोडतोडीतून डागडुजीची भाषा शिकताना या कवितेतून कवीचे कोणते मनोगत व्यक्त होते?
७.    धर्म आणि प्राणिमात्रांबद्दलचा दया भाव आता कसा बदलत गेला आहे, ते ‘मोहल्ला, पक्षी आणि कातरवेळ या कवितेच्या आधारे स्पष्ट करा.
८.    कल्पना दुधाळ यांच्या कवितेतील स्त्रीचा अस्तित्वशोध तुमच्या शब्दात स्पष्ट करा.
९.    कल्पना दुधाळ यांच्या कवितेतील आईच्या मनातील कल्लोळ तुमच्या शब्दांत व्यक्त करा.
१०. ‘ झुलत्या फांदीला गं या कवितेतून एका अल्लड मुलीचे कोणते चित्रण आले आहे?
११. ‘घोषणा या कवितेत कवयित्रीने कोणती वेदना व्यक्त केली आहे?
१२. ‘ढग असतेच आसपास या कवितेत प्रकटलेले कवयित्रीचे मन तुमच्या शब्दात उलगडून दाखवा.  


No comments:

Post a Comment